लहानपणी रत्नागिरीला मामाकडे किंवा मावशीकडे जाताना आई एसटी ने घेऊन जायची. तेव्हा , चिपळूण -एकथांबा-रत्नागिरी होती. आणि बाकीच्या गाड्यांचे कंडकटर ओरडायचे; "चिपळूण- सावर्डे- संगमेश्वर- हातखंबा-वांद्री-रत्नागिरी"..हे इतकं वेगात कसं बोलतात इथूनच कुतूहल सुरू व्हायचं. आणि नंतर ते तिकीट काढायला आले की, ते नक्की कुठे पंच मारतात ते काय कळायचं नाही आणि अजूनपण नीट कळलं नाही. आता तर ते तिकीटच कालबाह्य झालं.
एसटी स्टँड म्हणजे एक वेगळं जगच. कोणाला एसटीचा त्रास होतो तर कोणाला घरघर आवाज आवडत नाही. बरेचजण तिकीट जास्त म्हणूनही प्रवास टाळतात. पण "वाट पाहीन ,पण एसटीनेच जाईन" असा सुद्धा एक वर्ग आहे.मी त्यातलाच हो !
आता मी जवळपास गेली 10-12 वर्षे एकट्याने प्रवास करतो. एसटी स्टँड आणि एसटी नव्याने बदलतायत. पण काही गोष्टी तशाच आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोणत्याही एसटी स्टँडवर गेलात आणि तिथे तुम्हाला "आवळा सुपारी" मिळाली नाही असं होणारच नाही. आलेपाक आणि आवळा सुपारी 100% मिळण्याचं ठिकाण म्हणजे एसटी स्टँड. आणि या दोन गोष्टी विकणारे तसेच ते शेंगदाणे विक्रेते हे कायम मनात प्रश्न घेऊन येतात. या वस्तूची किंमत ती किती, दिवसाचा खप किती आणि त्यातून फायदा तो किती. तरीही या जगातले हे लोक कोणाला गावातला पत्ता सांगत ; विचारेल त्याला एसटीची वेळ सांगत आपलं काम चालूच ठेवतात.
जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आणि येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक हा तक्ता एक वाचनीय असतो. खरंतर त्यात सगळी माहिती नीट कळते पण तरीही आपण सगळेच खिडकीवर जाऊन विचारल्याशिवाय समाधानी होत नाही. पूर्वी ते खिडकीच्या आत बसणारे काका एकदम चिडत. आजकाल सौजन्य सप्ताह इत्यादी गोष्टीमुळे ते कमी झालंय.
हा खिडकीच्या आतला माणूस म्हणजे "अष्टावधानी" -
एका हातात पेन, त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची नोंद करणे. दुसरीकडे ते " मुंबईकडे जाणारी गाडी फलाट क्रमांक 5वर लावण्यात आली आहे" ही एसटी पेटंट सूचना देत असतात. आणि प्रवाशांच्या प्रश्नांना तोंड देत असतात, खरंच मानलं पाहिजे त्यांना.
अशी ही एसटी अगदी खेड्यापाड्यात पोचलेली आहे. वस्तीच्या जाणाऱ्या गाड्या पण आहेत कोकणात. गाडीच्या वेळेनुसार लोक तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करतात. प्रत्येक छोट्या छोट्या गावातून जाणारी एसटी म्हणजे वाहतुकीची उत्तम सोय. जर ही एसटी ची वेळ चुकली तर पुन्हा ती गाडी येइपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत काम पुढे ढकलायला लागेल म्हणून माणसांची गर्दी दिसून येते गावागावात बस स्टॉप वर.
आता गावागावातले , घाटमाथ्याचे रस्ते, शहरातील ट्रॅफिक हे सगळं पार पाडून एसटी ड्रायव्हर कशी काय गाडी नेतात ते त्यांनाच माहीत. त्यातसुद्धा काही जण म्हणतात, गाडी उशिरा येते, कधी वेळेवर सुटत नाही. पण ते ड्रायव्हर काका बिचारे , त्यांचं काम योग्य पध्दतीने करतच असतात. "वाट पाहीन पण एसटीनेच जाईन" मित्रमंडळ कार्यकर्ते अजिबात एसटी ला काहीही न बोलता एसटीनेच प्रवास करतात.
या मंडळींमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे लोक असतात. कधी एखादा माणूस समोरून जाणाऱ्या खाजगी वाहन चालकाला सांगतो, "मागून येतेय एसटी". एखादा शेजारी उभ्या सहप्रवासीला एसटीनेच जाण्यास प्रवृत्त करत असतो, "काय भरवसा नाही हो खाजगी वाहनांचा, आपली एसटी भारी". काही दैनंदिन कामासाठी एसटीने प्रवास करणारे लोक तर झोपेतून उठून पण स्टॉपचं नाव सांगतात.
आता एवढं लिहिलं पण चालक आणि वाहक यांच्याबद्दल नाही लिहिलं तर मग एसटी हा विषयच पूर्ण होणार नाही.
चालक म्हणजे खरंच देव माणूस. 50 जणांना सुखरूप प्रवास घडवायचं काम लीलया पेलणारा माणूस. काही तांत्रिक किंवा प्रशासकीय बाबीमुळे एसटी या वाहनांची अवस्था तशी वाईटच असते किंवा दिसून येते. त्यातही चालक ते वाहन सफाईने चालवतात. गाडीची आणि त्याबरोबरच प्रवाशांची काळजी घेणे आणि त्यांना सुखरूप ठरलेल्या ठिकाणी नेऊन सोडणे हे महत्त्वाची कामे असतातच. याशिवाय स्टँडवर गाडीची नोंद करणे आणि एखादा प्रवासी विनंती करेल तेव्हा इच्छित स्थळी गाडी थांबवणे ही अतिरिक कामे त्यांनाच. रातराणीच्या प्रवासात सगळ्यांना गाढ झोप लागलेली असताना हा माणूस एकटा जागा असतो. एस्टीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्राथमिक दुरुस्ती करण्यास पण एकच माणूस , यावेळी तिथे कोणी माहितगार असेल तर उत्तम, नाहीतर मग बाकी सगळे "बघे"च. दुसरा मला कायमच कुतूहल वाटत राहिलं ते एसटीच्या आरशाचे किंवा साईड मिररचे. हे चालक लोक त्या एवढ्याश्या आरशात बघून कसं काय मागचं वाहन ओळखतात देव जाणे.
याशिवाय वाहक पण एस्टीमध्ये एक मुख्य माणूस. शाळेच्या हेडमास्तर सारखा त्या प्रवासात होणाऱ्या सगळ्या गोष्टींना जबाबदार हाच माणूस. मध्यंतरी एकदा प्रवासात माझ्या पुढील सिटवर माणूस तक्रार करत होता, "हा शेजारचा माणूस झोपेत डोकं माझ्या खांद्यावर टाकतोय, एकतर मला दुसरी सीट द्या किंवा त्यांना उठवा". वाहक बिचारा त्यांचा तंटा सोडवत होता.
वाहकाकडे असलेली शिट्टी आणि त्याचे विशिष्ट आवाज हे अगदी लक्षात राहण्यासारखे. एसटीची "जाऊदे रे गाडी" आणि "थांबा" यासाठी बेलची पण वेगळी पद्धत. हे सगळं प्रवासात बघण्याची मजा जी लहानपणी असायची ती वेगळीच. शेवटच्या सीटवरून पण वाहक चालकाला योग्य सूचना देऊ शकतो ते शिट्टी आणि बेलमुळे. तिकीटाची पेटी, हातात पंच मशीन , खिशाला अडकवलेली शिटी, हातात पेन, पैशाची बॅग , वाटेत ठेवलेले प्रवासी समान आणि वळणावळणाचे रस्ते ;असा सगळा वाहकाचा काम करण्याचा अतिशय अवघड प्रसंग असतो. गाडीने वळण घेतलं किंवा अचानक गाडी थांबली तरी वाहक त्याचं काम करतच राहतो. प्रवाशांबरोबरचे गाडीच्या आरक्षणावरून किंवा सुट्टे पैशावरून होणारे वाद, याबरोबरच प्रवाशांची आपापसातील भांडण सोडवणे , प्रत्येक थांब्यावर नवीन प्रवासी मग पुन्हा तेच काम असा सगळा क्रम चालूच राहतो.
पोलीस खात्यानंतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामावर असणारे दुसरे कर्मचारी म्हणजे वाहक आणि चालक. अगदी दिवाळीच्या दिवशी पहाटे पण एसटी धावते आणि गणपती विसर्जन दिवशी सुद्धा. याशिवाय ओव्हरटाईम आणि परत कमी पगार हेही त्यांच्याच वाट्याला आलं आहे.
गणपती च्या दिवसात कोकणात गजबजलेल्या एसटी स्टँडवर चालक आणि वाहक त्यांचं काम नेमाने करतच असतात. जेवढी गर्दी रेल्वेला तेवढीच एसटीला पण. रेल्वे स्टेशन वर जायला सुद्धा एसटी च !!!
एसटीचा कायापालट होईल आणि एसटी अजून सुस्थितीत येईल याची वाट बघतोय. एसटी स्टँड बरोबर वाहक आणि चालकाच्या विश्रामगृहाचा पण चेहरा मोहरा बदलूदे. पॉश आणि AC एसटी च्या तिकिटासारखा पगार पण चालक वाहकाला मिळुदे.
सलाम एसटी चालकांना आणि इतर तांत्रिक कर्मचारी वर्गाला.
सलाम एसटी स्टँडवरच्या टपाल ,पेपर किंवा इतर जड वस्तू वाहणाऱ्या हमालांना.
एसटी पूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. १९४८ पासून एसटी धावतेय आजतागायत. अशीच एसटी सगळयांची ने आण करत राहील आणि "वाट पाहीन पण एसटीनेच जाईन" म्हणणाऱ्यांची संख्या वाढेल. काही वर्षांनी लाल डबा शब्दच विसरतील लोक आणि येतील चकाचक गाड्या. पण खाकी युनिफॉर्म, काळे फलक आणि "हात दाखवा गाडी थांबवा" हे कायम लक्षात राहील.
Let's Say वाट पाहीन पण एसटीनेच जाईन. Long Live MSRTC