दिवाळी आहे परवा, त्यामुळे चाललोय चिपळूण ला. एकदम खूष... घरी जायचं म्हणजे झोपेतून उठून पण जाऊ शकतो.
प्रवास म्हणजे त्यात अचानक भेटणारे प्रवासी मित्र आले, हे मित्र फक्त प्रवासापुरते असतात. या मैत्रीसाठी वयाची अट नाही. दोन्ही मित्रांनी एकाच ठिकाणी चढण्याची किंवा उतरण्याची पण अट नाही.
(टीप: अगदी बसल्या क्षणापासून उतरेपर्यंत इयरफोन टाकून बसणार्यांना हि मैत्री कळणार नाही)
या मैत्रीसाठी उगाच इकडचा तिकडचा एखादा प्रश्न विचारावा लागतो किंवा ट्रेन क्रॉसिंग ला तरी थांबावी लागते.😂
पण एकदा सुरुवात झाली कि मग कोणाला ऐकतायत का ते मित्र !!! झोप लागेपर्यंत अखंड बडबड.
मागच्या एका प्रवासात एक काका भेटले होते, आधी संपूर्ण नोकरी करून निवृत्ती नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय पण चालू केलेला. अजब रसायन !...
ते म्हणतात की, ज्या लोकांना बाहेर नोकरी मिळत नाही किंवा ज्यांना शिकवणं कठीण , त्यांनाच मी घेतो.
त्यांचा असा ठाम विश्वास आहे की, शून्यातून वर आलेला माणूस "मेहनत" हा शब्द विसरत नाही. एकदम आवडलं हे वाक्य !!! असे मित्र क्वचितच मिळतात ...
अगदी मागच्या वर्षी, लोकल ने प्रवास होत असे रोज. तेव्हा तर मी रोज वेगळ्या ट्रेन ने जात होतो, तरी पण रोज वेगळे मित्र. ट्रेन कशी लेट होते, कर्जत किती लांब आहे, वेस्टर्न लाईन कशी चांगली आहे, दारात उभं राहणार्यांना काही कळत नाही; हे चर्चेचे टॉप रेटेड विषय. या प्रवासात बॅग रॅक वर ठेवणारे, उतरताना मदत करणारे, बसायला जागा देणारे मित्र पण भेटतात.
मागे एकदा कराड ते चिपळूण प्रवास करताना एका माणसाने, वेगवेगळ्या शहरातील लोक आणि भाषा यावर चर्चा केलेली. ते जेवढे फिरलेत ते ऐकून मी गप्प च बसलो. "मी खूप फिरलोय" हा माझा गर्व लगेच कमी झाला.
एका प्रवासात मुंबईत परीक्षेसाठी आलेले शीख पोलीस मित्र भेटलेले, त्यांचे अनुभव ऐकण्यात माझा प्रवास पूर्ण झालेला. "पोलीस असल्यावर किती जबाबदारी असते ना?" असा फक्त प्रश्न विचारला आणि ते दोघे चालूच झाले. मग पुढे मला काहि बोलावच लागलं नाही. त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पण काय नीटसं जमलं नाही.
एकदा लोणेरे-चिपळूणच्या प्रवासात , गाडी स्टॅन्ड वर पोचत असताना शेजारच्या माणसाने विचारलं, राहतोस कुठे ? आडनाव काय ? एकटाच आहेस ? कोणी येणारे न्यायला ? ....मी हो, नाही आणि पत्ता सांगितल्यावर त्याने डायरेक्ट ऑर्डर च दिली उतरल्यावर माझ्या सोबत चल...मी 10 वेळा नको नको केलं असेल,मी भलताच घाबरलो...शेवटी त्याने सोडलं घरी आणि जाताना सांगितलं मी "पोलीस"...Speechless म्हणजे काय ते तेव्हा कळलं मला.!!! जाताना म्हणाले, एवढासा आहेस तरी रात्री प्रवास करतोस☺😁...माझे पोलीस मित्र.. !!
एकदा प्रवासात गणपती कारखाना चालवणारे काका भेटले. एक माणूस किती काम करू शकतो, ते तेव्हा कळलं मला, ते स्वतः गणपती बनवतात, प्रवासी किंवा माल वाहतुकीची गाडी चालवतात, आंबे व्यवसाय हंगामी, घरी एक छोटं जनरल स्टोअर्स, आणि इतर.
वय वर्ष 49..!!!..
'कोणतंही काम करायला नाही म्हणालो नाही कधी' हे त्यांनी अभिमानाने सांगितलं. आणि त्यांच्या बोलण्यात गर्व वगैरे पण नव्हता. आणि दुसऱ्याच क्षणी, एका भिकार्याला पैसे न देता, खायला दिलं.
त्यांचं म्हणणं कि, इतकी सगळी कामं असताना पण फुकट भीक मागत फिरणं हेच यांचं काम !!..
असो, असे एक आणि अनेक अनुभव येतात. याशिवाय गाडीत होणारे छोटे मोठे वाद, ते सोडवायला जाणराच कसा अडकतो, हे बघण्याची मजा😉..
गाडीत अखंड बडबड करणाऱ्या काकू, प्रत्येक स्टेशन ला वडापाव मागणारी लहान मुले, डुलकी घेता घेता दुसऱ्याच्या खांद्यावर आपटणारे इसम , इत्यादी...
प्रवास म्हणजे खूप काही अनुभव देऊन जाणारी एक शिकवणी .!!
आणि हो, आज मी इयरफोन लावलेले अगदी बसल्यापासून उतरेपर्यंत..😀😉🎧
...
Kay sir.. ata mitrach lagna tharla...amhala watla tya vishayawar lekh lihal ekhada...aso...
ReplyDeletelekha baddal no comments.
मित्राची मुलाखत घेईन म्हणतो ...!!!😉🤓
ReplyDeleteतिखट प्रतिक्रिया दिलीत सर !!!