Sunday, August 28, 2016

वसतिगृह - वस्ती नाय तर दोस्ती नाय !!!

कधी कधी आपण आयुष्यात वेगळ्या वळणावर जातो तिकडे नवीन अनुभव मिळतात, आणि मग अजून मजा येते. आपल्याला ते जग आवडायला लागतं.

१०वी झाल्यावर डिप्लोमा ला प्रवेश घ्यायचं ठरवलं, आणि इकडे तिकडे फॉर्म भरत भरत, शेवटी लोणेरे ला प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.(इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग)- शाखा -अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकी.
लोणेरे कॉलेज आणि तिथला परिसर याबद्दल तिथे राहिल्यावरच कळतं.
इतकं मोठं कॉलेज पण तिथे फक्त कॉलेजच....

शाळेतला साधा मुलगा मी(स्वतःची स्तुती) , आणि या नवीन कॉलेज ला आल्यावर नवीन मित्र भेटले. कोणी अभ्यासात हुशार, तर कोणी खेळाडू, कोणी बोलण्यात एक्स्पर्ट, एखादा बॉडी बिल्डर, एखादा फसवाफसवी चा एक्स्पर्ट, एखादा १२वी करून आल्यामुळे कॉलेज लाईफ चा एक्स्पर्ट..अशी मोठी यादीच आहे.
माझ्यासाठी सगळंच नवीन होत.

या सगळ्यासोबत तिथे माझा आत्तेभाऊ पण होता. नवीन असताना तोच माझा मार्गदर्शक. अगदी प्रवेश प्रक्रियेपासून ते हॉस्टेल मध्ये सगळ्यांसोबत ओळख करून देण्यापर्यंत. तो म्हणजे कॉलेज मधला सगळ्यात हुशार विद्यार्थी, नंतर कॉलेज चा गोल्ड मेडलिस्ट पण झाला.

हॉस्टेल चा पहिला दिवस -
बाबा सोडायला आलेले पहिल्या दिवशी, एक दिवस कॉलेज केलं आणि दुपारी आलो रूम वर. ४-५ वाजता बाबा म्हणतात जातो आता चिपळूणला.
आणि मी शांत च बसलो, आता काय करायचं कळेना..अक्षरशः रडलो..रूममेट्स अजून आलेच नव्हते, रूम मध्ये पंखा पण नाही..
बाबा समजावत होते, नवीन ओळख कर, 4 दिवसांनी यायचेच आहे घरी वगैरे...
तो रडण्याचा कार्यक्रम झाला, आणि तो तिथेच संपला. आता बाबा बोलतात, तेव्हा जे रडलास ते शेवटचं..!!!

खरंच तसं झालंय, त्या पहिल्या दिवसानंतर हॉस्टेल ने जे काही शिकवलं त्यामुळे आता कुठेही राहू शकतो.

त्यानंतर कॉलेज चालू झालं, हळूहळू मैत्री झाली...
चिपळूण चा एक मित्र होता पण तो पहिला एक आठवडा कॉलेज लाच आला नाही...तसा नंतर पण खूप कमीच आला..कारण त्याला "चिपळूण" ला पळण्याची घाई..अर्थात जायचो मी सुद्धा..पण आता त्याचं नाव पुढे करतोय. डिप्लोमा ची तीन वर्षे आम्ही दोघे रूममेट कायम. त्याने आणलेला खाऊ आणि 'परांजपे चिवडा' अजून आठवतो. सकाळच्या 6 च्या एसटीला पण कायम एकत्र जाणार , जाता जाता पोलादपूर ची पुरीभाजी ठरलेली. दोघे पहिल्या सेमिस्टरला पहिल्या बाकावर बसलो, मग तो डायरेक्ट मागच्या बाकावर गेला, पण आमची मैत्री कायम राहिली ती अगदी अजूनपर्यंत....#Chiplunkar #Rodiz

पहिल्या दिवसावरून कधी दुसरीकडे गेलो लक्षातच नाही, शेवटी विषय चिपळूणच्या मित्राचा होता... 😊
असो...
पहिल्याच दिवशी भेटला एक खेड चा मित्र...तो सुद्धा पहिल्या बाकावर बसला आणि पहिल्या प्रॅक्टिकलला पण..त्या दिवसापासून ज्या गप्पा चालू झाल्या त्या आजतागायत चालूच आहेत..तुझी शाळा , माझी शाळा..तुमचं खेड आमचं चिपळूण करत 3 वर्षाच्या गप्पा रंगल्या...दिवसभर झोपून मग रात्रभर अभ्यास करणारा मित्र, घरच्या फोन वर तासंतास बोलणारा मित्र, गजर ऐकू येत नाही म्हणून त्याला घरून फोन यायचा..पण खूप हुशार सुद्धा.!!..कधी त्याचा सोबत तर कधी त्याचे कॉपी करून फाईल पूर्ण केल्या..physics च्या प्रॅक्टिकल ला सांडलेला पारा अजून आठवतो...मेस मध्ये चपतीच्या कडा काढायला पण त्यानेच शिकवलं..आता कोणत्याच मेस मधली चपाती मला कडक लागत नाही. #Khed #Alarm_snooze

खेड वरून लक्षात आलं, गुजर आळीचं प्रोमोशन करणारा आणि पहिल्या वर्षाचा माझा रूममेट..मी एका शब्दात त्याला "गुरु" म्हणेन..छक्के पंजे हे करता आलेच पाहिजेत,हे त्याने शिकवलं. त्याचं हिशोबाच्या वहीचं ऑडिट असायचं माझ्याकडे. मला विचारणार नेहमी , नाश्त्याचे किती झाले ? एकूण 14 रुपये सांगितले की, याच्या वहीत 18 रुपये असायचे..मग म्हणणार,असूदे रे होतात इकडे तिकडे ऍडजस्ट..आता जास्त खोलात जात नाही, राहूदे ते😂.
त्याचसोबत डीन च्या बंगल्यावर जेवायला गेल्याचा प्रसंग अगदी अविस्मरणीय आहे. तेव्हा मी एकदम घाबरट, पास तर होते जेवणाचे पण आधी दोन जण जाऊन आले होते तर परत कसं जायचं ??🤔..पण आमचे गुरु घेऊन गेले तिकडे..आणि मग सगळे ओळखीचे सर दिसायला लागल्यावर आमची पळापळ चालू, जेवण काय सोडलं नाही, भरपेट जेऊन आलो..
शाहिद कपूर चा फॅन म्हणून अक्ख्या हॉस्टेल ला फेमस..पहिल्या वर्षाला काहीतरी वर्गणी गोळा करण्याचे काम चालू होते हॉस्टेल मध्ये, आणि त्यात मध्ये पडून , ते काम स्वतः करून, आमच्या रूमला वर्गणी माफ करून देण्याची किमया साधून दिली होती..हे पण तेव्हा माझ्यासाठी नवीनच होतं. (हा विषय जरा आतल्या गोटातील आहे). आता मस्त सेटल होऊन घरडा मध्ये नोकरी मिळवलेली आहे..मस्त चाललंय साहेबांचं!!!...
#Gujar_ali_cha_shahid #centrifugal_pump_favourite_topic

मी त्या कॉलेज ला गेलो 15 व्या वर्षीच, तेव्हापासून अंगाने बारीकच पण WWE बघण्याची आवड, या कॉलेज मध्ये एक मित्र भेटला, same to same "Batista"..त्याच्यासोबत फिरलो कि काय टेन्शन नाही.. कोण हात लावणारे आपल्याला ???..
अलिबाग चा होता,आणि कोळी पण..काय ते माशाचे प्रकार, आम्हाला काय माहित पण नसायचं!!..खाणं म्हणजे चिकार !!..गेलो की 1-2 मिसळ आणि 1-2 वडापाव फिक्स ( हे कमीतकमी आहे ).
एक मिसळीच्या बदल्यात 1 एक्सपेरिमेन्ट लिहून द्यायला सुरुवात केलेली त्याने एकदा, चांगला फायदा झाला, आम्हाला सगळ्यांनाच😜😂.
होस्टेलच्या खिडकीबाहेर थोडी जागा होती, नेट ला चांगली रेंज येते म्हणून तिथे बसणार मित्र..!!!
त्याचा आवडता खेळ फुटबॉल, मला टेन्शन यायचं कि एखाद्याला याचा हात लागला धावता धावता, तर तो तिथेच आडवा होईल.
अलिबाग ची भाषा मला शिकवणारा मित्र, 'मंगशी आलेला' आणि 'बेनं ये' एवढंच शिकलो मी..#Batista #Foodie #Bodyguard

अलिबागचा अजून एक मित्र...ऋतिक रोशन चा फॅन...आमच्या ग्रुप चा ऋतिकच !!! फुटबॉल, शेरलॉक होल्म्स, ऋतिक रोशन,लॅपटॉप आणि खायला मासे..हे एवढं याचं जग.!!!..३ वर्षात कॉलेज ला दिसला तो फक्त gathering ला, बाकी आम्ही हॉस्टेल वर नेहमी एकाच रूम मध्ये असायचो. "दामल्या..." अशी हाक ऐकली कि समजणार हा आला....पहिल्या वर्षाला इंजिनीरिंग drawing च्या शीट्स काढून दिलेल्या त्याने,तेवढं मी अजून लक्षात ठेवलंय. रात्री हॉस्टेल च्या TV वर पिक्चर बघणं पण त्याने सोडलं नाही..excitement तर इतकी असायची कि, कायम धावत असायचा. त्यात अजून सिनिअर्सशी ओळख असणार, मग अजून वट हॉस्टेल मध्ये, आम्हाला पण मग त्याचा कधीकधी फायदा..!! या जोडीला ब्रँच आयटी, प्रोग्रामिंग पण शिकला चांगलं...पुस्तक वाचन आणि चालू घडामोडी माहित असणारा..काही जण कॉलेज ला रोज जात नसले तरी बाकी विषयात हुशार असतात, असं माझं मत बनलं तेव्हाच !! Hritik #Happy_Go_Lucky

चिपळूणचा अजून एक मित्र भेटला, पण तो भेटला दुसऱ्या वर्षाला. आमच्या ग्रुप मधला "गाडी" असणारा एकच मित्र. तेव्हा हायवे पर्यंत गाडीवरून जाऊन यायचं म्हणजे पण एक मजा होती माझ्यासाठी. एकदा तर चिपळूण पर्यंत गाडीवरून गेलो आणि ते पण घरच्यांना कळू न देता!!!..खूप हुशार ,पण मस्ती जास्त त्यामुळे Passout होयला वेळ लागला #विषय_खोल_आहे.
सलमान खान चा फॅन, हातात त्याचासारखंच ब्रेसलेट.
त्याचसोबत काही चर्चा झाली की, दुसऱ्याला कसं बोलून गुंडाळायचं याचं एक प्रात्यक्षिक मिळणार. हेच शिकलो त्याच्याकडून..
#Salman_da_fan #Born_Talent

आता सगळ्यात शेवटी सांगतो ते त्या मित्राबद्दल, ज्याचासोबत छोटंसं भांडण झालेलं आणि एक वर्ष बोललो नव्हतो. रोज यायचा रूम मध्ये पण एक शब्द बोलत नव्हतो. चांगला मित्र होता, भांडण छोटंसं होतं.. मग दोघंही विसरून गेलो. हॉस्टेल वर हे शिकता येतं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून बसलो तर सगळी माणसं लांब जातील, एकत्र राहा मजा करा !!
मेस मध्ये जेवताना भेट होत होती, आणि बाकी खेड चिपळूण चर्चा चालू असायची. मत्स्यगंधा एक्सप्रेस चा फॅन..कायम त्यानेच जाणार..खेड च्या ज्ञानदीपचा विद्यार्थी, तिथल्या आठवणी आवर्जून सांगणार..#Memory_keeper #SRK_fan

ज्याला आम्ही प्रेमाने भालू बोलत होतो, तो एक मित्र. मध्यंतरी एकदा बोललेला, एकदाचं हे जातीचं भांडण मिटवून टाका रे..काय रोज रोज ची भानगड.

कोलाड वरून येजा करणारा, त्यासोबत बाकी घरच्या टेन्शन मधेय पण नेहमी हसत असणारा एक मित्र..त्याचा जगलिंग चा मी फॅन आहे अजून पण..पेपरच्या आधी एक दिवस अभ्यास फक्त 2-3 तास, बास विषय खल्लास!!...पण त्याला वाटलं तरच.!!☺

याच काही मित्रांसोबत केलेला "Krazzy5" ग्रुप; तो पण चांगलाच लक्षात राहीला.
बाकी अजून खूप मित्र भेटले, मदतीला धावून येणारे मित्र तुम्हाला हॉस्टेल मध्येच भेटतील, एकदा काहीतरी लागलं होतं आणि रक्त थांबतच नव्हतं तेव्हा "ईश्वरासारखा" धावून आलेला मित्र..त्याने चक्क सायकल वरून डॉक्टरकडे नेलेलं रात्री 11 वाजता.

घरून नेलेली "गुळपोळी" आवडीने खाणारा "अन्या", मूर्ती लहान पण कीर्ती महान असे "पाटील", कबड्डी मध्ये कॉर्नर चा एक्स्पर्ट "विनोद" , आगरातळा वरून येऊन इथे मराठी शिकणारा "देब",....असे एक नाही अनेक मित्र....

हॉस्टेल च्या TV रूम मध्ये बसून बघितलेले "सचिन"ची डबल सेंचुरी..#Unforgettable कमीत कमी 200 जण होते हॉल मध्ये...

मित्रांबद्दल लिहिता लिहिता किती काय काय आठवलं... माझा मीच बदलून गेलो तेव्हा या सगळ्यामुळे...खूप भारी वाटतं आता ते आठवून..!!!

Thursday, August 25, 2016

व्यक्ती तितक्या प्रकृती !

शीर्षक दिलंय "व्यक्ती तितक्या प्रकृती "...पण मी काय सारं जग फिरून आलोय आणि लिहितोय वगैरे असं काही नाही....माझेच जवळचे मित्र आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव..यावरून हे असं काहीतरी लिहावंसं वाटलं
मित्र-1
माझा जिवलग मित्र..नाव जाहीर करत नाही. उद्या जर माझा ब्लॉग प्रसिद्ध झाला तर उगाच तो पण प्रसिद्ध व्हायचा..
.कोणत्या गोष्टीवर कधी एकमेकाला टोमणा मारू ते सांगता येत नाही...टोमणा हे खूपच चांगलं बोललो, तसं आम्ही खूप काय काय बोलतो एकमेकाला..
शाळेत असताना वक्तशीरपणे न चुकता माझ्या घरी यायचा , आणि मी तेव्हा आवरत असायचो..तरीपण तो वाट पाहत राहायचा..
मागे 2-3 वर्षांपूर्वी काही कारणासाठी , तो असाच वाट पाहत थांबला होता, तब्बल 5 तास !!!
आमचं एकमत कोणत्या गोष्टीवर होत नाही , पण आजपर्यंत कधी भांडण पण झालं नाही..
माझा वाहन प्रशिक्षक पण तोच, आमच्या मित्र परिवाराचा वाहनचालक पण तोच!!
एकदम शांत स्वभावाचा, तसेच वाहन या विषयात विशेष आवड आणि त्यात पदव्युत्तर शिक्षण पण!!.
मी आळशी, तो वक्तशीर
मी फक्त प्रवासी, तो वाहन चालक
मित्र-2
कोणत्या गोष्टीवर टीका ऐकायची असेल तर यांना विचारा..प्रत्येक गोष्टीत negative बाजू शोधून दाखवणार हा माझा मित्र.
ना कोणत्या राजकीय पक्षाचा follower, ना कोणत्या नटाचा किंवा नटीचा फॅन, ना कोणतं आवडतं पुस्तक...
हे हे मला खूप आवडलं, असं खूप कमी वेळा ऐकलय मी त्याच्याकडून..
मित्रपरिवारातला संगणक तज्ज्ञ माणूस. डिजिटल साक्षरता प्रमाण 100%
शाळेत असताना मराठीच्या पेपर ला आधी निबंधाने सुरुवात करणारा, आणि संस्कृतचं बाह्य भाषांतर जमणारा एकटाच इसम !
आम्ही कोणत्या गोष्टीत वाद घातला नाही , असं झालंच नाही.  आमच्या वादाचा बाकीच्यांना त्रास !! पण आम्ही वाद घालतच राहतो.
मित्र-3
आधी सांगितलं तो मित्र वक्तशीर, पण हा वेळेच्या खूपच आधी धावणारा माणूस. दैनंदिन वेळापत्रक कसं बनवावं ते मी त्याच्याकडून शिकणार आहे. पण ते बनवायला पण मी अजून वेळ शोधतोय.
कोणत्याही कामाला जाताना, यायचं आणि जायचं आरक्षण करून जातो हा, म्हणजे कार्यक्रम ठरलेलाच असतो.
हे कसं काय जमतं त्याला, ते अजून कळलेलं नाही मला.
एक दिवस आजारी होता म्हणून घरी आरामाला आला होता, तेव्हा पण त्याच्याकडे परत जायचं आरक्षण होतं, अजबच !!!
आमच्या सहलीचा व्यवस्थापक पण हाच असतो , अगदी निर्विवाद !!
सुतासारखा सरळ असं म्हणतो आम्ही त्याला.
कोणत्याही गोष्टीत रिस्क घेणे नाही.
कॉलेज ला attendance पण ९०% च्या वर.
प्रत्येक गोष्टीत नको म्हणणार, वडापाव खाल्ला तर पोट दुखतं, ice cream खाल्लं तर सर्दी होते..प्रत्येक वेळी अडचण !
असो, माझ्यासारख्या अनियमित वेळापत्रक असणाऱ्याला असा मित्र मिळाला हे मी माझं भाग्य समजतो.
मित्र-4
जसा एक चालक, एक व्यवस्थापक..तसा एक पर्यटक पण असावा मित्रपरिवारात. माझ पण आहे असा एक मित्र.
कधी सहलीला जायचं ठरत असेल तर , यांचं मत अंतिम !!
सहलीला गेल्यावर कॅमेरामन ची भूमिका बजावणारा मित्र. काही epic गोष्टी याच्याकडेच असतात.
जेव्हा भेटायचं ठरेल तेव्हा लगेच हजर, लांब राहत असून पण लगेच हो म्हणणार भेटायला..चांगली सवय..!!
बोलता बोलता punch मारायची सवय आहे याला.
तसा जास्त बडबड करत नाही , पण एकच punch जोरात असतो.
महत्वाचं म्हणजे माझा ब्लॉग सगळ्यात आधी वाचणारा माझा मित्र !!
मित्र-5
अंगाने बारीक पण हाडाचा मेकॅनिकल इंजिनीयर..
आजारी असताना पण रोज 2 तास प्रवास करून ऑफिसात नोकरी केली. आता mtech पूर्ण करून परत नोकरी मिळवेल, माझ्या आधी मास्टर्स पूर्ण करतो की काय कोणास ठाऊक ?
खेळाडू मित्र...बुद्धिबळ आणि क्रिकेट हे आवडते खेळ.
जरा काही बोललं कोणी तर लगेच चिडणारा माझा मित्र पण माझ्यावर कधी चिडला नाही आजपर्यंत.
वेगाने गाडी चालवण्याची आवड...अगदी गाडी झोपवून चालवली होती एकदा , आणि मी मागे होतो, अविस्मरणीय!
पत्ते खेळण्यात पण एक्स्पर्ट.. excitement वरच्या  लेव्हल ची..
रात्री जागून tv बघण्याची सवय...हे बाकी आवडलं आपल्याला...
मित्र 6
10 वी पर्यंत , सकाळच्या वेळी माझ्या घरचा landline वाजला कि सगळ्यांना कळायचं, कोणाचा फोन  असणार ते. हाच तो !!...हा धडा वाचू कि तो धडा वाचू ??
10 वी त एक मार्क त्याच्यापेक्षा जास्त मिळाला होता तेव्हा मला बोर्डात आल्यासारखं वाटलं होतं.
तेव्हापासून तो त्याच्या आईला घाबरतो, तो अजूनपर्यंत तेवढाच घाबरतो.
फोटोग्राफीचं व्यसन लागलय त्याला आता..
कॉलेजात प्रोफेसर पण बनलाय..
सहलीला जायला हो म्हणणार आणि आयत्यावेळेला नाही म्हणणार, हा त्याचा विशेष गुण !
बांधवगड नामक परिसरात जाण्याचा रेकॉर्ड करणार आता ...
10वी झाली, सगळे जण आपापल्या शैक्षणिक  मार्गाला लागले. आता तर नोकरी सुद्धा ...पण अजूनही
एक वार्षिक सहल आणि सणासुदीला चिपळूण ला भेटणं हे नियमित चालू आहे.
कोणी शांत तर कोणी बडबड करणारा, कोणी मराठी चित्रपट चाहता तर कोणी हॉलिवूड चा चाहता..
कोणाला गर्दीत फिरायला आवडतं तर एखाद्याला शांतता पाहिजे..एखादा लाजरा तर दुसरा बिनधास्त...
वेगळ्या स्वभावाचे असतात तरी पण एकत्र राहतात, ते म्हणजे "मित्र"
गोष्टी नव्या कितीही चांगल्या असल्या तरी , मित्र जुनेच चांगले असतात !!

एसटी : जीवनवाहिनी

लहानपणी रत्नागिरीला मामाकडे किंवा मावशीकडे जाताना आई एसटी ने घेऊन जायची. तेव्हा , चिपळूण -एकथांबा-रत्नागिरी होती. आणि बाकीच्या गाड्यांचे क...