एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे वेगवेगळ्या पिढीतील सख्खी किंवा चुलत भावंडे आणि त्यांचे कुटुंब एकत्र मस्त मजेत राहतायत. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती कमी होत आहे. मोठ्या शहरात तर अगदी अभावाने दिसेल.
मस्त मजेत राहतायत यासाठी म्हणालो कि, एकत्र राहणं महत्वाचं आहे...मुंबईतील मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये ४-५ फ्लॅट घेणं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती नव्हे !!
एका घरात सगळे एकत्र आले पाहिजेत. वातावरण कसं मित्रांच्या कट्ट्यासारखं झालं पाहिजे.
जेवण करणाऱ्या ३-४ जणी एकत्र स्वयंपाकघरात, बाहेरच्या खोलीत निवडणुकीमध्ये कोण पडणार आणि कोण येणार यावर चर्चा करणारे सगळे काका आणि आजोबा, त्यातच मध्ये मध्ये गडबड करणारे लहान लहान भाऊ-बहिणी..
यातच आतून आजीचा आवाज "बस झालं रे ते तुमचं राजकारण, तो आमदार जेवण आणून देणारे का तुम्हाला ??..चला बघू जेवायला" एवढं नुसतं ऐकलं तरी घरातला रागीट काका पण जेवायला पळणार !!!
आता तुम्ही म्हणाल कि, हे काय शक्य आहे का?
खरंच घडतं असं काही जणांच्या घरात...गणपती, दिवाळी ला घरातली धावपळ म्हणजे बघण्यासारखी!..तोरणं लावणारी मोठी ताई, तिला मदत करणाऱ्या बाकी बहिणी. इकडे lighting च्या माळा सोडायला मोठा दादा पुढे..
खरंच, हे सगळं काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरात घडत होतं, ते तसच सुरु राहील असतं तर किती छान झालं असतं. पण माणूस प्रगतीसाठी धडपडत असतो, नोकरीनिमित्त अनेकांना बाहेरगावी किंवा मोठ्या शहरात जावं लागतं. मग ते लोक तिकडचेच होऊन जातात. आणि असं होत होत आता चित्रच बदलून गेलं.
आता आपण एका घरात आजी-आजोबा, आई-वडील आणि मुलं एकत्र राहिली तरी त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो..व्याख्याच बदलून टाकली जणू.!!
काही जणांना ते पण सुख मिळत नाही या धावत्या जगात.
घरी आजी-आजोबा असणं म्हणजे त्या घरच्या कर्त्या पुरुषाला एक आधार...मानसिक पाठबळ.! लहान मुलांना सगळ्यात प्रिय असतात ते आजी आजोबाच.
आई-बाबा ओरडले तर आजीकडे जाऊन रडणारं लहान मूल असेल नाहीतर आजी आजोबांना औषधाच्या गोळ्या आणून देणारा मोठा नातू. त्यांना दोघेही सारखेच..!!
आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील , तर मग शाळेत जाताना तयारी करणारी पण आजीच, घराच्या गेटपर्यंत रिक्षेसाठी सोडायला येणारे आजोबा; हे सगळं किती छान वाटतं.
आई वडील ऑफिस ला गेले की, आजी आजोबा हेच आपलं जग !!..
सणाला आजीच्या हातचे गोडधोड खायची मजा दुसऱ्या कशात नाही ...नातवंडे अभ्यास करतायत कि नाही हे लक्ष ठेवणारे आजोबा प्रत्येक घरात असावेत.
संध्याकाळी फिरून येताना, काहीतरी खायला घेऊन येणारे आजी आजोबा मुलांना नक्कीच आवडतात. त्यांचा हातातील पिशवी घेण्यासाठी मुलांची धावपळ..!! हे असं सगळं चित्र बघितलं तर खूपच आनंददायी वाटतं.
या धावत्या जगात, प्रत्येकाला आजी आजोबांसोबत राहायला मिळत नाही. मग ती मुलं , गावाला गेली की ते एक वेगळंच नातं तयार होतं. खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातवंडांसाठी आजोबा कपडे, खाऊ सगळं काही आणणार.
घरी स्वयंपाकामध्ये आईला टिप्स देणारी आजी , नोकरी करत असताना पण सकाळचं जेवण करून जाणारी आई, त्यांचं एकमेकांचं Coordination म्हणजे न बोलता समन्वय !!☺
पैशाचे व्यवहार चोख ठेवणारे आजोबा, आणि त्यातच नवनवीन वस्तू आणणारे वडील, मग एवढं महाग कशाला आणलं म्हणून त्यांचा प्रश्नोत्तर तास चालू.!!
नातवांसाठी जे पाहिजे ते आणणारे आजोबा, त्यांच्या मुलाने काही आणलं कि मात्र हिशोबी होतात..😁
या एकत्र कुटुंबात, आजी आजोबांचं जेवढं प्रेम महत्वाचं आहे तेवढंच आई वडिलांचं पण आहेच. नोकरी व्यवसातून वेळ काढून मुलांना ते वेळ देतात. काय हवं नको ते बघतात. आणि इथे परत , त्यांचं नीट लक्ष आहे की नाही त्याचं परीक्षण करणारे आजी आजोबा.
घरच्या हळदी कुंकू इत्यादी कार्यक्रमाला आई आणि आजी दोघींची तयारी एकदम युद्धपातळीवर🙄..
सणाच्या आदल्या दिवशी, वडील आणि आजोबा यांची साफसफाई मोहीम.
हे आणि असं बरंच काही आहे एकत्र कुटुंबात, क्षणाक्षणाला आनंद आहेच, थोडे खटके पण उडतात. पण ते क्षणिक, दुसरा दिवस पुन्हा नव्याने चालू.
एकत्र राहायला मिळणं हे आनंददायी आहेच, पण जर ते शक्य नसेल तरी पण ते प्रेम आणि आनंद सतत भेटत राहून मिळवू शकतो.
आता सगळे जण कट्ट्यावर भेटतात, मित्र , मैत्रिणी, सकाळचा जॉगिंग ग्रुप, रविवारचा मिसळ ग्रुप, ऑफिस ग्रुप; असे वेगवेगळेे कट्टे.
पण हा फॅमिली कट्टा आपण कधी विसरू नये. जसं आपण "friends are my family" म्हणतो; तसं "आपलं कुटुंब हा पण एक कट्टा समजूया". या कट्ट्यावर संस्कार, धमाल, वादविवाद, राग, मदत, आज्ञा, उपदेश, प्रेम, सगळंच आहे.
या कट्ट्यावर रोज जाणाऱ्यांनी कट्टा टिकवून ठेवा, बाकीच्यांनी कट्ट्यावर सतत भेटत राहा.