Thursday, October 27, 2016

प्रवास ..!!!

दिवाळी आहे परवा, त्यामुळे चाललोय चिपळूण ला. एकदम खूष... घरी जायचं म्हणजे झोपेतून उठून पण जाऊ शकतो.

प्रवास म्हणजे त्यात अचानक भेटणारे प्रवासी मित्र आले, हे मित्र फक्त प्रवासापुरते असतात. या मैत्रीसाठी वयाची अट नाही. दोन्ही मित्रांनी एकाच ठिकाणी चढण्याची किंवा उतरण्याची पण अट नाही.
(टीप: अगदी बसल्या क्षणापासून उतरेपर्यंत इयरफोन टाकून बसणार्यांना हि मैत्री कळणार नाही)

या मैत्रीसाठी उगाच इकडचा तिकडचा एखादा प्रश्न विचारावा लागतो किंवा ट्रेन क्रॉसिंग ला तरी थांबावी लागते.😂
पण एकदा सुरुवात झाली कि मग कोणाला ऐकतायत का ते मित्र !!! झोप लागेपर्यंत अखंड बडबड.

मागच्या एका प्रवासात एक काका भेटले होते, आधी संपूर्ण नोकरी करून निवृत्ती नंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय पण चालू केलेला. अजब रसायन !...
ते म्हणतात की, ज्या लोकांना बाहेर नोकरी मिळत नाही किंवा ज्यांना शिकवणं कठीण , त्यांनाच मी घेतो.
त्यांचा असा ठाम विश्वास आहे की, शून्यातून वर आलेला माणूस "मेहनत" हा शब्द विसरत नाही. एकदम आवडलं हे वाक्य !!! असे मित्र क्वचितच मिळतात ...

अगदी मागच्या वर्षी, लोकल ने प्रवास होत असे रोज. तेव्हा तर मी रोज वेगळ्या ट्रेन ने जात होतो, तरी पण रोज वेगळे मित्र. ट्रेन कशी लेट होते, कर्जत किती लांब आहे, वेस्टर्न लाईन कशी चांगली आहे, दारात उभं राहणार्यांना काही कळत नाही; हे चर्चेचे टॉप रेटेड विषय. या प्रवासात बॅग रॅक वर ठेवणारे, उतरताना मदत करणारे, बसायला जागा देणारे मित्र पण भेटतात.

मागे एकदा कराड ते चिपळूण प्रवास करताना एका माणसाने, वेगवेगळ्या शहरातील लोक आणि भाषा यावर चर्चा केलेली. ते जेवढे फिरलेत ते ऐकून मी गप्प च बसलो. "मी खूप फिरलोय" हा माझा गर्व लगेच कमी झाला.

एका प्रवासात मुंबईत परीक्षेसाठी आलेले शीख पोलीस मित्र भेटलेले, त्यांचे अनुभव ऐकण्यात माझा प्रवास पूर्ण झालेला. "पोलीस असल्यावर किती जबाबदारी असते ना?" असा फक्त प्रश्न विचारला आणि ते दोघे चालूच झाले. मग पुढे मला काहि बोलावच लागलं नाही. त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पण काय नीटसं जमलं नाही.

एकदा लोणेरे-चिपळूणच्या प्रवासात , गाडी स्टॅन्ड वर पोचत असताना शेजारच्या माणसाने विचारलं, राहतोस कुठे ? आडनाव काय ? एकटाच आहेस ? कोणी येणारे न्यायला ? ....मी हो, नाही  आणि पत्ता सांगितल्यावर त्याने डायरेक्ट ऑर्डर च दिली उतरल्यावर माझ्या सोबत चल...मी 10 वेळा नको नको केलं असेल,मी भलताच घाबरलो...शेवटी त्याने सोडलं घरी आणि जाताना सांगितलं मी "पोलीस"...Speechless म्हणजे काय ते तेव्हा कळलं मला.!!! जाताना म्हणाले, एवढासा आहेस तरी रात्री प्रवास करतोस☺😁...माझे पोलीस मित्र.. !!

एकदा प्रवासात गणपती कारखाना चालवणारे काका भेटले. एक माणूस किती काम करू शकतो, ते तेव्हा कळलं मला, ते स्वतः गणपती बनवतात, प्रवासी किंवा माल वाहतुकीची गाडी चालवतात, आंबे व्यवसाय हंगामी, घरी एक छोटं जनरल स्टोअर्स, आणि इतर.
वय वर्ष 49..!!!..
'कोणतंही काम करायला नाही म्हणालो नाही कधी' हे त्यांनी अभिमानाने सांगितलं. आणि त्यांच्या बोलण्यात गर्व वगैरे पण नव्हता. आणि दुसऱ्याच क्षणी, एका भिकार्याला पैसे न देता, खायला दिलं.
त्यांचं म्हणणं कि, इतकी सगळी कामं असताना पण फुकट भीक मागत फिरणं हेच यांचं काम !!..

असो, असे एक आणि अनेक अनुभव येतात. याशिवाय गाडीत होणारे छोटे मोठे वाद, ते सोडवायला जाणराच कसा अडकतो, हे बघण्याची मजा😉..
गाडीत अखंड बडबड करणाऱ्या काकू, प्रत्येक स्टेशन ला वडापाव मागणारी लहान मुले, डुलकी घेता घेता दुसऱ्याच्या खांद्यावर आपटणारे इसम , इत्यादी...

प्रवास म्हणजे खूप काही अनुभव देऊन जाणारी एक शिकवणी .!!

आणि हो, आज मी इयरफोन लावलेले अगदी बसल्यापासून उतरेपर्यंत..😀😉🎧
...

Friday, October 14, 2016

#काय_लिहू आणि #कसं_लिहू ?

काय लिहायचं आणि कसं लिहायचं ?? हा प्रश्न आपल्यातल्या प्रत्येकाला पडतो. नेमकं वेळेवर याचं उत्तर आपल्याला सापडत नाही.

म्हणजे अगदी एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीच्या फोटोवर प्रतिक्रिया करताना पण लोक ४-५ वेळा बदल करतात त्यात..उगाच कोणाला काय वाटेल, बाकीचे वाचतील तर काय म्हणतील?..

😊परीक्षेत उत्तर लिहिताना पण असंच, अर्ध पान उत्तर होतंय. आता अजून लिहू का ? आणि लिहायच तर ते काय लिहू ?

एखाद्या मुलीला पहिल्यांदा मेसेज करताना पण मुलं दुसऱ्या मित्राला विचारतात, "काय लिहू रे ???"..आता तो तरी काय सांगणार बापडा...तो पण म्हणतो लिही काहीतरी तुला वाटेल ते!!!😜

हे तर सोडाच, बँक मध्ये फॉर्म भरताना इथे सही करू कि तिथे ?; इंग्लिश मध्ये लिहू कि मराठीत ?.अशा नानाविध शंका.

परवाच एकाने विचारलं, राजीनामा अर्ज कसा लिहू रे ?..मी म्हणालो "पुढच्या महिन्यापासून येणार नाही" म्हणून लिही ४ शब्दात..😂..नेमकं अशा वेळीच काय लिहायचं हा प्रश्न उद्भवतो..नाहीतर Please revert asap असं मेल वर लिहिण्यात सगळे जण पटाईत असतात.

सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो अभिप्राय देताना. एखाद्या चित्रप्रदर्शनाला गेलो की "छान, सुंदर, अप्रतिम" यापुढे आपण काही अभिप्राय लिहीत नाही.
आणि आजकाल पंचाईत होते जेव्हा , काही फॉर्म वर suggestion किंवा feedback नाही दिला तर ते काम पूर्ण होत नाही. मग तिथे माझ्यासारखे लोक चक्क "NA" लिहितात.

पण या सगळ्यावर मात करणारे काही जण असतात, फेसबुक आल्यापासून तर यांची संख्या वाढली आहे😁..

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे काहींना 200 शब्दात निबंध लिहा वाटतं, फोटो ला caption देणं म्हणजे "हॅशटॅग" या धारदार अस्त्राचा सफाईने वापर..
झुकरबर्ग दादांनी तर लोकांचा प्रॉब्लेमच सोडवून टाकला. फेसबुक reactions, स्टिकर्स मुळे सगळं काम सोपं. हे झालं फक्त सोशल मीडिया वर.

तरी पण अजून #काय_लिहू आणि #कसं_लिहू याचं उत्तर मिळालंच नाही...कोणाला माहिती आहे का उत्तर ?

शेवटी हा प्रश्न कधीच न पडणाऱ्या समस्त लेखक , ब्लॉगर, कवी, इत्यादी सगळ्यांना सलाम आणि सप्रेम नमस्कार !!!!...

खरं सांगायचं तर मला पण आत्ता प्रश्न पडलेला, काय लिहू? आणि कसं लिहू ?☺

Friday, September 30, 2016

फॅमिली कट्टा : एकत्र कुटुंब पद्धती

एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे वेगवेगळ्या पिढीतील सख्खी किंवा चुलत भावंडे आणि त्यांचे कुटुंब एकत्र मस्त मजेत राहतायत. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती कमी होत आहे. मोठ्या शहरात तर अगदी अभावाने दिसेल.

मस्त मजेत राहतायत यासाठी म्हणालो कि, एकत्र राहणं महत्वाचं आहे...मुंबईतील मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये ४-५ फ्लॅट घेणं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती नव्हे !!
एका घरात सगळे एकत्र आले पाहिजेत. वातावरण कसं मित्रांच्या कट्ट्यासारखं झालं पाहिजे.

जेवण करणाऱ्या ३-४ जणी एकत्र स्वयंपाकघरात, बाहेरच्या खोलीत निवडणुकीमध्ये कोण पडणार आणि कोण येणार यावर चर्चा करणारे सगळे काका आणि आजोबा, त्यातच मध्ये मध्ये गडबड करणारे लहान लहान भाऊ-बहिणी..

यातच आतून आजीचा आवाज "बस झालं रे ते तुमचं राजकारण, तो आमदार जेवण आणून देणारे का तुम्हाला ??..चला बघू जेवायला" एवढं नुसतं ऐकलं तरी  घरातला रागीट काका पण जेवायला पळणार !!!

आता तुम्ही म्हणाल कि, हे काय शक्य आहे का?
खरंच घडतं असं काही जणांच्या घरात...गणपती, दिवाळी ला घरातली धावपळ म्हणजे बघण्यासारखी!..तोरणं लावणारी मोठी ताई, तिला मदत करणाऱ्या बाकी बहिणी. इकडे lighting च्या माळा सोडायला मोठा दादा पुढे..

खरंच, हे सगळं काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरात घडत होतं, ते तसच सुरु राहील असतं तर किती छान झालं असतं. पण माणूस प्रगतीसाठी धडपडत असतो, नोकरीनिमित्त अनेकांना बाहेरगावी किंवा मोठ्या शहरात जावं लागतं. मग ते लोक तिकडचेच होऊन जातात. आणि असं होत होत आता चित्रच बदलून गेलं.

आता आपण एका घरात आजी-आजोबा, आई-वडील आणि मुलं एकत्र राहिली तरी त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो..व्याख्याच बदलून टाकली जणू.!!
काही जणांना ते पण सुख मिळत नाही या धावत्या जगात.

घरी आजी-आजोबा असणं म्हणजे त्या घरच्या कर्त्या पुरुषाला एक आधार...मानसिक पाठबळ.! लहान मुलांना सगळ्यात प्रिय असतात ते आजी आजोबाच.
आई-बाबा ओरडले तर आजीकडे जाऊन रडणारं लहान मूल असेल नाहीतर आजी आजोबांना औषधाच्या गोळ्या आणून देणारा मोठा नातू. त्यांना दोघेही सारखेच..!!

आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील , तर मग शाळेत जाताना तयारी करणारी पण आजीच, घराच्या गेटपर्यंत रिक्षेसाठी सोडायला येणारे आजोबा; हे सगळं किती छान वाटतं.
आई वडील ऑफिस ला गेले की, आजी आजोबा हेच आपलं जग !!..

सणाला आजीच्या हातचे गोडधोड खायची मजा दुसऱ्या कशात नाही ...नातवंडे अभ्यास करतायत कि नाही हे लक्ष ठेवणारे आजोबा प्रत्येक घरात असावेत.
संध्याकाळी फिरून येताना, काहीतरी खायला घेऊन येणारे आजी आजोबा मुलांना नक्कीच आवडतात. त्यांचा हातातील पिशवी घेण्यासाठी मुलांची धावपळ..!! हे असं सगळं चित्र बघितलं तर खूपच आनंददायी वाटतं.

या धावत्या जगात, प्रत्येकाला आजी आजोबांसोबत राहायला मिळत नाही. मग ती मुलं , गावाला गेली की ते एक वेगळंच नातं तयार होतं. खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातवंडांसाठी आजोबा कपडे, खाऊ सगळं काही आणणार.

घरी स्वयंपाकामध्ये आईला टिप्स देणारी आजी , नोकरी करत असताना पण सकाळचं जेवण करून जाणारी आई, त्यांचं एकमेकांचं Coordination म्हणजे न बोलता समन्वय !!☺

पैशाचे व्यवहार चोख ठेवणारे आजोबा, आणि त्यातच नवनवीन वस्तू आणणारे वडील, मग एवढं महाग कशाला आणलं म्हणून त्यांचा प्रश्नोत्तर तास चालू.!!
नातवांसाठी जे पाहिजे ते आणणारे आजोबा, त्यांच्या मुलाने काही आणलं कि मात्र हिशोबी होतात..😁

या एकत्र कुटुंबात, आजी आजोबांचं जेवढं प्रेम महत्वाचं आहे तेवढंच आई वडिलांचं पण आहेच. नोकरी व्यवसातून वेळ काढून मुलांना ते वेळ देतात. काय हवं नको ते बघतात. आणि इथे परत , त्यांचं नीट लक्ष आहे की नाही त्याचं परीक्षण करणारे आजी आजोबा.

घरच्या हळदी कुंकू इत्यादी कार्यक्रमाला आई आणि आजी दोघींची तयारी एकदम युद्धपातळीवर🙄..
सणाच्या आदल्या दिवशी, वडील आणि आजोबा यांची साफसफाई मोहीम.

हे आणि असं बरंच काही आहे एकत्र कुटुंबात, क्षणाक्षणाला आनंद आहेच, थोडे खटके पण उडतात. पण ते क्षणिक, दुसरा दिवस पुन्हा नव्याने चालू.

एकत्र राहायला मिळणं हे आनंददायी आहेच, पण जर ते शक्य नसेल तरी पण ते प्रेम आणि आनंद सतत भेटत राहून मिळवू शकतो.

आता सगळे जण कट्ट्यावर भेटतात, मित्र , मैत्रिणी, सकाळचा जॉगिंग ग्रुप, रविवारचा मिसळ ग्रुप, ऑफिस ग्रुप; असे वेगवेगळेे कट्टे.
पण हा फॅमिली कट्टा आपण कधी विसरू नये. जसं आपण "friends are my family" म्हणतो; तसं "आपलं कुटुंब हा पण एक कट्टा समजूया". या कट्ट्यावर संस्कार, धमाल, वादविवाद, राग, मदत, आज्ञा, उपदेश, प्रेम, सगळंच आहे.

या कट्ट्यावर रोज जाणाऱ्यांनी कट्टा टिकवून ठेवा, बाकीच्यांनी कट्ट्यावर सतत भेटत राहा.

Wednesday, September 28, 2016

"जाती" संपून "जाती"ल का ?

या ब्लॉग मध्ये लिहिलेलं प्रत्येक मत माझं वैयक्तिक आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही.

"जात"  जात होती निघून तिच्या गावाला..मी म्हणलं थांब...'जाती'स कुठं ??...तू नाही तर मग मजा नाही इथं!!!

जात आहे म्हणून प्रत्येकाला स्वतःच्या जातीच्या महापुरुषांचा अभिमान आहे आणि त्यांचा मनापासून आदर आणि जयजयकार पण करतायत सगळे लोक..सगळं कसं नीट चाललंय...आत्ताच्या पिढीने मस्त वाटणी करून घेतलेली आहे....तू जाशील आणि दुसराच काहीतरी पेच करून ठेवशील!!!....कदाचित लोक महापुरुषांनाच विसरले तर ?? जो तो म्हणेल मीच श्रेष्ठ !!!

जात आहे  म्हणून इथे काही दैनंदिन व्यवसाय तरी नीट चालू आहेत, तरुण वर्ग शिक्षण दुसरं (e.g. engineering किंवा medical) घेत असला तरी , जातीनिहाय उद्योग किंवा तत्सम काम शिकतात घरच्या घरी..."तू" जाशील आणि नंतर शिवणकाम , सुतारकाम अशा कामांचा पेच च करून ठेवशील.!!!...नाहीतर पुढच्या पिढीला घराचं रंगकाम पण फोटोशॉप मध्ये करावं लागेल आणि कान टोचायला पण घरीच सुई घेऊन बसावं लागेल.

जात आहे म्हणून खाण्यात पण विविधता आहे..कोणी श्रीखंडाशिवाय दुसरं पक्कवान नाही म्हणतं तर एखाद्याला समुद्रात जाऊन मासे पकडून आणून तो खाण्यात मजा वाटते. एखादा कांदा खात नाही म्हणतो तर दुसरा मस्त एका ठोक्यात कांदा फोडून खातोय.. कोणी ,काय , कसं, किती जेवायचं ते पण ठरवून दिलयस तू. यात बदल करणारा कोणी एक जण लाजत लाजत खातो तर कधी दुसरा म्हणतो कसं खाऊ एवढं गोड गोड..

मित्रांनो, बघा हे असं आहे तर.....

आहे तसेच चालू ठेवायचं म्हणाल तरी प्रश्न आहेच, कोण मागे राहतेय तर कोणाला वाटतंय आमचीच माणसं मागे राहतात .....कोणी म्हणतं सगळं काय मिळतं ते त्यांनाच...कोणी म्हणतं आमच्यावर आधी अन्याय झालाय,आता तरी आम्हाला पुढे येउद्या. कोणी म्हणतं, मिळतंय तुम्हाला एवढं तर मग विसरा आता मागचं.

जात म्हणते आहे, आदर करा माझा...भांडून काय मिळणार तुम्हाला ?....काही काही गोष्टी समजून घ्या..देवावर विश्वास ठेवा..तो नाही विचारणार तुम्हाला जात !!...मग झालं तर....देव पाठीशी असताना टेन्शन कसलं ??

जात हे एक कामानुसार केलेलं व्यवस्थापन म्हणून बघितलं तर सगळं कसं सुरळीत चालेल..म्हणजे मग उद्या वादविवाद आणि भांडण तंटे होणारच नाहीत...
..
...
....
......
........
पण नको.
..
...
....
.....
.....
प्रत्येकाने त्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम पण केलं पाहिजे. एखाद्याला असेल आवड विशिष्ट क्षेत्राची तर मग त्याला आवड सोडून जातीनुसार मिळेल ते काम निमूटपणे करावं लागेल. म्हणजे मग परत जैसे थे!..ते देश विकसित होणं तर राहील बाजूलाच पण उलट्या दिशेने प्रवास चालू होईल..

इकडे आड आणि तिकडे विहीर असं होतंय हे तर...!!

शाळा कॉलेजात मैत्री करताना जात बघत नाही, प्रवासात गप्पा मारताना जात बघत नाही. अनोळखी भागात गेल्यावर जात बघत नाही, तिथे मग समोरचा माणूस लगेच आपला होतो.. रस्त्यात गाडी बंद पडली की धक्का मारताना जात बघत नाही.  वरातीत वाजंत्री मधले लोक उत्तम वाजवतात, नकळत दाद दिली जाते तेव्हा त्यांची जात बघत नाही..तिथे सगळी कडे "माणुसकी"...अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यात आपल्या मनात जातीचा विचार सुद्धा येत नाही. म्हणजे प्रत्येकातला माणूस अजूनही जिवंत आहेच...फक्त त्याला शोधून जगासमोर आणायचं आहे.
...विविवधतेत एकता हे फक्त जगाला सांगण्यासाठी नको, ती एकता प्रत्यक्षात आली पाहिजे.
थोडं "उन्नीस बिस" होईल पण जिथे तिथे जातीचा उल्लेख करून हिणवायचं किंवा भांडणं करायची हे सगळं थांबलं पाहिजे. एकमेकांच्या जातीबद्दल जुन्या काळातले पुरावे देऊन भांडत बसणे आणि विशेषतः त्या विशिष्ट जातीतील प्रसिद्ध लोकांबद्दल वाईट पसरवणे, हे सगळं थांबलं पाहिजे.
क्रांतिकारक जर जात बघत बसले असते तर मग आजचा हा दिवसच दिसला नसता.

जातीचे कौतुक होउदे पण विटंबना नको..!!...सगळे संत जर स्वर्गात चर्चा करत असतील तर त्यांना वाटत असेल, आपलं काय सांगायचं राहून तर गेलं नाही ना ???....

जमेल का आपल्याला "माणूस" बनायला आणि जातीचा द्वेष किंवा विडंबन न करता "आदर" करायला???....
नाहीतर पुन्हा चक्र उलट दिशेने फिरतील असं दिसतंय.....

असो....चला "माणूस" बनवूया...माणूस हि "जात" घडवूया

Sunday, August 28, 2016

वसतिगृह - वस्ती नाय तर दोस्ती नाय !!!

कधी कधी आपण आयुष्यात वेगळ्या वळणावर जातो तिकडे नवीन अनुभव मिळतात, आणि मग अजून मजा येते. आपल्याला ते जग आवडायला लागतं.

१०वी झाल्यावर डिप्लोमा ला प्रवेश घ्यायचं ठरवलं, आणि इकडे तिकडे फॉर्म भरत भरत, शेवटी लोणेरे ला प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.(इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग)- शाखा -अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकी.
लोणेरे कॉलेज आणि तिथला परिसर याबद्दल तिथे राहिल्यावरच कळतं.
इतकं मोठं कॉलेज पण तिथे फक्त कॉलेजच....

शाळेतला साधा मुलगा मी(स्वतःची स्तुती) , आणि या नवीन कॉलेज ला आल्यावर नवीन मित्र भेटले. कोणी अभ्यासात हुशार, तर कोणी खेळाडू, कोणी बोलण्यात एक्स्पर्ट, एखादा बॉडी बिल्डर, एखादा फसवाफसवी चा एक्स्पर्ट, एखादा १२वी करून आल्यामुळे कॉलेज लाईफ चा एक्स्पर्ट..अशी मोठी यादीच आहे.
माझ्यासाठी सगळंच नवीन होत.

या सगळ्यासोबत तिथे माझा आत्तेभाऊ पण होता. नवीन असताना तोच माझा मार्गदर्शक. अगदी प्रवेश प्रक्रियेपासून ते हॉस्टेल मध्ये सगळ्यांसोबत ओळख करून देण्यापर्यंत. तो म्हणजे कॉलेज मधला सगळ्यात हुशार विद्यार्थी, नंतर कॉलेज चा गोल्ड मेडलिस्ट पण झाला.

हॉस्टेल चा पहिला दिवस -
बाबा सोडायला आलेले पहिल्या दिवशी, एक दिवस कॉलेज केलं आणि दुपारी आलो रूम वर. ४-५ वाजता बाबा म्हणतात जातो आता चिपळूणला.
आणि मी शांत च बसलो, आता काय करायचं कळेना..अक्षरशः रडलो..रूममेट्स अजून आलेच नव्हते, रूम मध्ये पंखा पण नाही..
बाबा समजावत होते, नवीन ओळख कर, 4 दिवसांनी यायचेच आहे घरी वगैरे...
तो रडण्याचा कार्यक्रम झाला, आणि तो तिथेच संपला. आता बाबा बोलतात, तेव्हा जे रडलास ते शेवटचं..!!!

खरंच तसं झालंय, त्या पहिल्या दिवसानंतर हॉस्टेल ने जे काही शिकवलं त्यामुळे आता कुठेही राहू शकतो.

त्यानंतर कॉलेज चालू झालं, हळूहळू मैत्री झाली...
चिपळूण चा एक मित्र होता पण तो पहिला एक आठवडा कॉलेज लाच आला नाही...तसा नंतर पण खूप कमीच आला..कारण त्याला "चिपळूण" ला पळण्याची घाई..अर्थात जायचो मी सुद्धा..पण आता त्याचं नाव पुढे करतोय. डिप्लोमा ची तीन वर्षे आम्ही दोघे रूममेट कायम. त्याने आणलेला खाऊ आणि 'परांजपे चिवडा' अजून आठवतो. सकाळच्या 6 च्या एसटीला पण कायम एकत्र जाणार , जाता जाता पोलादपूर ची पुरीभाजी ठरलेली. दोघे पहिल्या सेमिस्टरला पहिल्या बाकावर बसलो, मग तो डायरेक्ट मागच्या बाकावर गेला, पण आमची मैत्री कायम राहिली ती अगदी अजूनपर्यंत....#Chiplunkar #Rodiz

पहिल्या दिवसावरून कधी दुसरीकडे गेलो लक्षातच नाही, शेवटी विषय चिपळूणच्या मित्राचा होता... 😊
असो...
पहिल्याच दिवशी भेटला एक खेड चा मित्र...तो सुद्धा पहिल्या बाकावर बसला आणि पहिल्या प्रॅक्टिकलला पण..त्या दिवसापासून ज्या गप्पा चालू झाल्या त्या आजतागायत चालूच आहेत..तुझी शाळा , माझी शाळा..तुमचं खेड आमचं चिपळूण करत 3 वर्षाच्या गप्पा रंगल्या...दिवसभर झोपून मग रात्रभर अभ्यास करणारा मित्र, घरच्या फोन वर तासंतास बोलणारा मित्र, गजर ऐकू येत नाही म्हणून त्याला घरून फोन यायचा..पण खूप हुशार सुद्धा.!!..कधी त्याचा सोबत तर कधी त्याचे कॉपी करून फाईल पूर्ण केल्या..physics च्या प्रॅक्टिकल ला सांडलेला पारा अजून आठवतो...मेस मध्ये चपतीच्या कडा काढायला पण त्यानेच शिकवलं..आता कोणत्याच मेस मधली चपाती मला कडक लागत नाही. #Khed #Alarm_snooze

खेड वरून लक्षात आलं, गुजर आळीचं प्रोमोशन करणारा आणि पहिल्या वर्षाचा माझा रूममेट..मी एका शब्दात त्याला "गुरु" म्हणेन..छक्के पंजे हे करता आलेच पाहिजेत,हे त्याने शिकवलं. त्याचं हिशोबाच्या वहीचं ऑडिट असायचं माझ्याकडे. मला विचारणार नेहमी , नाश्त्याचे किती झाले ? एकूण 14 रुपये सांगितले की, याच्या वहीत 18 रुपये असायचे..मग म्हणणार,असूदे रे होतात इकडे तिकडे ऍडजस्ट..आता जास्त खोलात जात नाही, राहूदे ते😂.
त्याचसोबत डीन च्या बंगल्यावर जेवायला गेल्याचा प्रसंग अगदी अविस्मरणीय आहे. तेव्हा मी एकदम घाबरट, पास तर होते जेवणाचे पण आधी दोन जण जाऊन आले होते तर परत कसं जायचं ??🤔..पण आमचे गुरु घेऊन गेले तिकडे..आणि मग सगळे ओळखीचे सर दिसायला लागल्यावर आमची पळापळ चालू, जेवण काय सोडलं नाही, भरपेट जेऊन आलो..
शाहिद कपूर चा फॅन म्हणून अक्ख्या हॉस्टेल ला फेमस..पहिल्या वर्षाला काहीतरी वर्गणी गोळा करण्याचे काम चालू होते हॉस्टेल मध्ये, आणि त्यात मध्ये पडून , ते काम स्वतः करून, आमच्या रूमला वर्गणी माफ करून देण्याची किमया साधून दिली होती..हे पण तेव्हा माझ्यासाठी नवीनच होतं. (हा विषय जरा आतल्या गोटातील आहे). आता मस्त सेटल होऊन घरडा मध्ये नोकरी मिळवलेली आहे..मस्त चाललंय साहेबांचं!!!...
#Gujar_ali_cha_shahid #centrifugal_pump_favourite_topic

मी त्या कॉलेज ला गेलो 15 व्या वर्षीच, तेव्हापासून अंगाने बारीकच पण WWE बघण्याची आवड, या कॉलेज मध्ये एक मित्र भेटला, same to same "Batista"..त्याच्यासोबत फिरलो कि काय टेन्शन नाही.. कोण हात लावणारे आपल्याला ???..
अलिबाग चा होता,आणि कोळी पण..काय ते माशाचे प्रकार, आम्हाला काय माहित पण नसायचं!!..खाणं म्हणजे चिकार !!..गेलो की 1-2 मिसळ आणि 1-2 वडापाव फिक्स ( हे कमीतकमी आहे ).
एक मिसळीच्या बदल्यात 1 एक्सपेरिमेन्ट लिहून द्यायला सुरुवात केलेली त्याने एकदा, चांगला फायदा झाला, आम्हाला सगळ्यांनाच😜😂.
होस्टेलच्या खिडकीबाहेर थोडी जागा होती, नेट ला चांगली रेंज येते म्हणून तिथे बसणार मित्र..!!!
त्याचा आवडता खेळ फुटबॉल, मला टेन्शन यायचं कि एखाद्याला याचा हात लागला धावता धावता, तर तो तिथेच आडवा होईल.
अलिबाग ची भाषा मला शिकवणारा मित्र, 'मंगशी आलेला' आणि 'बेनं ये' एवढंच शिकलो मी..#Batista #Foodie #Bodyguard

अलिबागचा अजून एक मित्र...ऋतिक रोशन चा फॅन...आमच्या ग्रुप चा ऋतिकच !!! फुटबॉल, शेरलॉक होल्म्स, ऋतिक रोशन,लॅपटॉप आणि खायला मासे..हे एवढं याचं जग.!!!..३ वर्षात कॉलेज ला दिसला तो फक्त gathering ला, बाकी आम्ही हॉस्टेल वर नेहमी एकाच रूम मध्ये असायचो. "दामल्या..." अशी हाक ऐकली कि समजणार हा आला....पहिल्या वर्षाला इंजिनीरिंग drawing च्या शीट्स काढून दिलेल्या त्याने,तेवढं मी अजून लक्षात ठेवलंय. रात्री हॉस्टेल च्या TV वर पिक्चर बघणं पण त्याने सोडलं नाही..excitement तर इतकी असायची कि, कायम धावत असायचा. त्यात अजून सिनिअर्सशी ओळख असणार, मग अजून वट हॉस्टेल मध्ये, आम्हाला पण मग त्याचा कधीकधी फायदा..!! या जोडीला ब्रँच आयटी, प्रोग्रामिंग पण शिकला चांगलं...पुस्तक वाचन आणि चालू घडामोडी माहित असणारा..काही जण कॉलेज ला रोज जात नसले तरी बाकी विषयात हुशार असतात, असं माझं मत बनलं तेव्हाच !! Hritik #Happy_Go_Lucky

चिपळूणचा अजून एक मित्र भेटला, पण तो भेटला दुसऱ्या वर्षाला. आमच्या ग्रुप मधला "गाडी" असणारा एकच मित्र. तेव्हा हायवे पर्यंत गाडीवरून जाऊन यायचं म्हणजे पण एक मजा होती माझ्यासाठी. एकदा तर चिपळूण पर्यंत गाडीवरून गेलो आणि ते पण घरच्यांना कळू न देता!!!..खूप हुशार ,पण मस्ती जास्त त्यामुळे Passout होयला वेळ लागला #विषय_खोल_आहे.
सलमान खान चा फॅन, हातात त्याचासारखंच ब्रेसलेट.
त्याचसोबत काही चर्चा झाली की, दुसऱ्याला कसं बोलून गुंडाळायचं याचं एक प्रात्यक्षिक मिळणार. हेच शिकलो त्याच्याकडून..
#Salman_da_fan #Born_Talent

आता सगळ्यात शेवटी सांगतो ते त्या मित्राबद्दल, ज्याचासोबत छोटंसं भांडण झालेलं आणि एक वर्ष बोललो नव्हतो. रोज यायचा रूम मध्ये पण एक शब्द बोलत नव्हतो. चांगला मित्र होता, भांडण छोटंसं होतं.. मग दोघंही विसरून गेलो. हॉस्टेल वर हे शिकता येतं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून बसलो तर सगळी माणसं लांब जातील, एकत्र राहा मजा करा !!
मेस मध्ये जेवताना भेट होत होती, आणि बाकी खेड चिपळूण चर्चा चालू असायची. मत्स्यगंधा एक्सप्रेस चा फॅन..कायम त्यानेच जाणार..खेड च्या ज्ञानदीपचा विद्यार्थी, तिथल्या आठवणी आवर्जून सांगणार..#Memory_keeper #SRK_fan

ज्याला आम्ही प्रेमाने भालू बोलत होतो, तो एक मित्र. मध्यंतरी एकदा बोललेला, एकदाचं हे जातीचं भांडण मिटवून टाका रे..काय रोज रोज ची भानगड.

कोलाड वरून येजा करणारा, त्यासोबत बाकी घरच्या टेन्शन मधेय पण नेहमी हसत असणारा एक मित्र..त्याचा जगलिंग चा मी फॅन आहे अजून पण..पेपरच्या आधी एक दिवस अभ्यास फक्त 2-3 तास, बास विषय खल्लास!!...पण त्याला वाटलं तरच.!!☺

याच काही मित्रांसोबत केलेला "Krazzy5" ग्रुप; तो पण चांगलाच लक्षात राहीला.
बाकी अजून खूप मित्र भेटले, मदतीला धावून येणारे मित्र तुम्हाला हॉस्टेल मध्येच भेटतील, एकदा काहीतरी लागलं होतं आणि रक्त थांबतच नव्हतं तेव्हा "ईश्वरासारखा" धावून आलेला मित्र..त्याने चक्क सायकल वरून डॉक्टरकडे नेलेलं रात्री 11 वाजता.

घरून नेलेली "गुळपोळी" आवडीने खाणारा "अन्या", मूर्ती लहान पण कीर्ती महान असे "पाटील", कबड्डी मध्ये कॉर्नर चा एक्स्पर्ट "विनोद" , आगरातळा वरून येऊन इथे मराठी शिकणारा "देब",....असे एक नाही अनेक मित्र....

हॉस्टेल च्या TV रूम मध्ये बसून बघितलेले "सचिन"ची डबल सेंचुरी..#Unforgettable कमीत कमी 200 जण होते हॉल मध्ये...

मित्रांबद्दल लिहिता लिहिता किती काय काय आठवलं... माझा मीच बदलून गेलो तेव्हा या सगळ्यामुळे...खूप भारी वाटतं आता ते आठवून..!!!

एसटी : जीवनवाहिनी

लहानपणी रत्नागिरीला मामाकडे किंवा मावशीकडे जाताना आई एसटी ने घेऊन जायची. तेव्हा , चिपळूण -एकथांबा-रत्नागिरी होती. आणि बाकीच्या गाड्यांचे क...